Monday, November 9, 2009

कायदा

माणसांचा माणसावर उडत चाललेला विश्वास हा एक चर्चेचा विषय. जास्त अविश्वास म्हणजे जास्त नियम. मग ते ऑफिसात असो वा कारखान्यात. जास्त नियम म्हणजे जास्त नियमभंग व जास्त नियमभंग म्हणजे जास्त न्यायनिवाडे. मग वकीलांना काम मिळते. पण गंमतीची गोष्ट अशी की हे वकील मग अजून नियम बनविण्यात पुढाकार घेतात. स्वत:चे कळप बनवितात व राज्यकर्त्यांवर दबाव आणून अजून निर्बुद्ध कायदे बनवितात ज्याच्यातल्या पळवाटा त्यांनाच फक्त माहित असतात.

६-७ वर्षांपूर्वी काही वकीलीचे शिक्षण घेणार्‍या पुण्यातल्या विद्यार्थ्यांनी ’सुरक्षितते’च्यासाठी हेल्मेट सक्तीचे करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले व यशही मिळवले. कायदा निर्माण झाला. त्याच्या अंमलबजावणीसाठी पोलीस दल सरसावले. हा कायदा कधीच अंमलात आणता आला नाही. आज सुजाण नागरीक हेल्मेट वापरतातच की. त्याला कायदा करायची काय गरज होती कां?

जेथे अंमलबजावणी होताना दिसते तेथे कायद्याचा फोलपणा दिसतो. म्हणजे डोक्यावर काहीही कठीण गोलाकार वस्तू घालून त्याला हेल्मेट म्हणायला लागलेत. त्यातून सुरक्षितता किती मिळेल हे संशयास्पद आहे. शिवाय अशा ठिकाणी पोलीस पैसे वसूल करायला तत्पर झाले आहेतच.

हा कायदा करून हेल्मेट बनविणार्‍या कंपन्या अचानक वाढल्या व यथावकाश बुडाल्या.

जाता जाता -या गोष्टीत देखील काही देश इतर देशांपेक्षा वेगळे आहेत. अमेरिकेत २८८ नागरिकांमागे एक वकील आहे तर जपानमध्ये ५४१४ नागरिकांमागे एक.

Monday, November 2, 2009

रसेल ऍकॉफ

माझ्या अनेक शिक्षकांपैकी एका शिक्षकांचे गेल्या आठवड्यात निधन झाले. तसे त्यांनी मला प्रत्यक्ष शिकवले नसेल पण त्यांच्या लिखाणातून, यूट्यूबवरील भाषणातून काही शिकवण नक्की मिळाली. फार पूर्वी माझ्या सुरुवातीच्या एका टिपणात मी त्यांचा उल्लेख केला होता. त्यावेळी बाराहा कसे वापरायचे माहित नसल्यामुळे अनेक चुका आहेत याची जाणीव आहे.

http://meekaaymhanato.blogspot.com/search/label/%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%20%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE

Russel Ackoff

Tuesday, October 27, 2009

मराठी मुलगी

आजच्या टाईम्समध्ये एका मराठी मुलीने राजला इंग्रजी भाषेतील लेखातून आवाहन केले आहे. त्या लेखाचे शिर्षक समजून घ्यायला बहुतेक मराठी मुलांना डिक्शनरी उघडायला लागेल. म्हणजे मी मराठी मुलगा असल्यामुळे उघडलीच बघा. ’Redeem’ शब्दाचे सात अर्थ निघाले व माझी झाली पुन्हा पंचाइत.

आता मला स्वत:ला मुलगा म्हणून घ्यायचा थोडा संकोच होतो आहे कारण माझे वय जरा जास्तच आहे. पण त्या लेखाच्या खाली सही करणारी पन्नाशीची शोभा डे स्वत:ला मराठी मुलगी म्हणवून घेत असेल तर मी स्वत:ला मुलगा कां म्हणवून घेऊ नये ?

एकूण राजने स्वत:च्या कर्तृत्वाने जर सर्व मराठी माणसांची गोची करू नये अशी बाईंची ( हो, मी तिला बाईच म्हणणार !) इच्छा दिसते. याचा अर्थ बाई राजला मराठी लोकांचा प्रतिनिधी म्हणुन मान्य करतात. कांय करणार? आजूबाजूची प्रसारमाध्यमे जी बाईंना उचलून धरतात तीच राजला पण उचलून धरतात. त्यांची पेज ३ पत्रकारिता कधीच चु्कीची नसते. आता ते बाईंना मराठी मुलगी म्हणून पुढे आणू इच्छितात असे दिसते.

तुम्हाला स्वत:ला मराठी माणसात सामावून घ्यायचे असेल तर काही तरी वेगळे करण्याची गरज आहे. फक्त इंग्रजी वर्तमानपत्राचा आधार घेऊन ते जमेल असे वाटत नाही.

Monday, October 26, 2009

स्वगृह

सध्या अमेरिकेत दोन प्रवाह समाजात लक्षणीय रित्या वाढलेले दिसतात. एक म्हणजे पूर्वी घर सोडून दूर गेलेल्या व आता चाळीशीत असताना नोकरी गेलेल्या मुलांना आई-वडिलांच्या बरोबर रहावेसे वाटू लागले आहे. त्याच बरोबर १३-१४ वर्षांची मुले-मुली घरच्या हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून घर सोडून पळ काढतायत. फ़ुटपाथवर रहायला लागतात. या वयात नोकरी करता येत नाही त्यामूळे बेकायदेशीर धंदे करून पैसे कमावतात.

आपल्या कडेही दोन प्रवाह दिसायला लागले आहेत. आता कॉंग्रेस राष्ट्रवादीचे विजेते बंडखोर आघाडीला पाठिंबा द्यायला उत्सुक झालेले दिसतात. पाया पडतील अशोक चव्हाणांच्या. गेल्या आठवड्यापर्यंत पुकारलेले शत्रुत्व एका दिवसात पुरून टाकणारे हे वीर स्वगृही परतायला उतावीळ झाले आहेत. आणि दुसर्‍या प्रवाहात शिवसेनेतील टीन एजर्स बेकायदेशीर धंदे करणार्‍यांच्या गटात सामील होणार बघा. नुकतेच एका अमराठी मॅनेजरबरोबर बोलणे चालले होते, तर ते म्हणाले दत्ता सामंत परवडले पण राजचे राज नको. मुंबईतल्या धंद्यांची वाट लावणार बघा. मुंबईत फक्त मराठी लोकांचेच धंदे शिल्लक ठेवायचे म्हणजे मुंबईची काया पालटून जाईल. ओस पडेल ते शहर.

Sunday, October 25, 2009

सोंग

आपण असतो कोण आणि दिसतो कसे हा प्रश्न प्रत्येकाला पडत असतोच. आपण कधी कधी जरा जास्तच सोंगे घेत असतो. साहेबाच्या भाषणाला जोरजोरात मान हलवत असतो. एखाद्या न भावलेल्या चित्राकडे बघून जोरात ’वा! छान’ म्हणतो. कधी आपण लेखक आहोत असे सोंग आणतो. हे सगळे जाणुन बुजून चालते बरं का.

पैशाचे सोंग आणता येत नाही व त्या भानगडीत मी पडतही नाही. या आठवड्यात एका व्यक्तीबरोबर फक्त मी दहा मिनिटे घालवली असतील पण त्याने मला तळेगाव जवळील जमिनी स्वस्तात विकायला सुरुवात केली. दीड कोटीची जमीन १ कोटी ३० लाखात मिळवून द्यायची तयारी दाखवली. आजूबाजूच्या जमिनी विजय मल्ल्याने शरद पवारांच्या लावासाला शह देण्यासाठी ६०० कोटीला कशा विकत घेतल्या आहेत ही खास माहितीही दिली. मग काही दुसर्‍या विषयावरपण बोलणे झाले. मग भेट संपल्यावर त्या व्यक्तीने मला आग्रहाने स्वत:चा मोबाइल नंबर व नांव लिहून घ्यायला भाग पाडले. ते मी बस तिकीटावर लिहून घेतले तेव्हाच तो निघून गेला.

मला प्रश्न पडायला लागला की माझ्यासारखी सामान्य दिसणारी माणसे कांय सध्या कोटीच्या व्यवहारात धाडस करायला लागली आहेत की पैसेवाली माणसे साधेपणाने राहायला लागली आहेत? सोंग कोण घेतयं ?

एका अनामिकाने मला लेखकाचे सोंग पुन्हा घ्यायला लावले बघा.

Saturday, October 24, 2009

तालिबान

दोन तीन महिन्यांपूर्वी अफ़गाणिस्तानमधील परिस्थितीवरील दोन पुस्तके वाचल्यावर त्या देशाबद्दल विशेष कुतुहल निर्माण झाल्याचा मी पुर्वी उल्लेख केला आहेच.

गेले पांच दिवस न्यूयॉर्क टाइम्समध्ये एका अफ़गाणिस्तानमध्ये अपहरण झालेल्या वार्ताहराचे आत्मकथन पांच विभागात वाचायला मिळाले. रोड (Rohde) नावाच्या वार्ताहराला तालिबानच्या एका गटाने सात महिने कैदेत ठेवले होते. ती जागा वजिरिस्तानमध्ये होती. अर्थात दर थोड्या दिवसांनी जागा बदलली जात असे. बरोबर असलेल्या दुभाषाला व ड्रायवरला देखील पळवून नेले होते. व शेवटी हा वार्ताहर पळून जाऊन स्वत:ची सुटका करून घेऊ शकला. एकूण तालिबानची कार्यपद्धती त्याने फार जवळून बघितली असल्यामुळे त्यात वास्तव ओतप्रोत होते. त्याने अमेरिकन सरकारच्या तसेच तालिबानी गटांच्या कारवायांचे वर्णन फार सुरेख केले. शिवाय स्वत:च्या मनातील आशा निराशेशी कशी झुंज दिली हेही दिलखुलासपणे लिहिले आहे.

एकूणच तालिबान प्रकरण अमेरीकेला महागात पडणार असे वाटते. तेथे सरळ गणित चालत नाही. पुन्हा मोजमाप हा माझा आवडीचा विषय. दहा तालिबानातले तीन तालिबान मारले तर किती उरले? उरलेल्या सात तालिबानातले पांच घाबरून आपले वर्तणूक बदलतील तर दोन उरले. पण मेलेल्या तालिबानचे भाऊ, काका, मामा, मुले जर बदला घ्यायला सरसावले तर चाळिस तालिबान उरतील. मग आपण आपल्याला किती सैन्य वाढवायचे हे ठरवणार कसे?

Tuesday, October 13, 2009

पहाटेचा राग

पूर्वी सकाळी ध्वनिवर्धक लावुन दिलेली मशिदीतली बांग ऐकून जाग आली की त्याचा राग यायचा. पुढे कशामुळे तरी ते बंद पडले व परिसर शांत झाला.

आमच्या घरापासून जरा अंतरावर एक जुने देऊळ आहे. या परिसरात बर्‍यापैकी प्रसिद्ध. त्याचा उल्लेख पुर्वी एका टिपणात केला होता. गेल्या दहा वर्षात देवळाच्या विश्वस्तांनी देवळाची बरीच जमीन विकून भरपूर पैसा केला आहे. देऊळ आता भोवताली बांधलेल्या उंच इमारतींनी वेढलेले आहे. आता देवळापाशी जमलेल्या पैशाचा विनियोग कसा होत असेल तर एकामागोमाग एक धार्मिक कार्यक्रम साजरे करून. मग त्यासाठी दिवसाचे २४ तासदेखील कमी पडतात. रात्रभर भजने चालतात. ही भजने संपेपर्यंत सकाळची भसाड्या आवाजात आरती सुरू होते. या आरतीसाठी मृदंग वाजवणारे लोक सकाळी कसे मिळतात देव जाणे. या कार्यक्रमासाठी न चुकता ध्वनिवर्धक वापरात असल्यामुळे त्या उंच इमारतीत राहणार्‍या लोकांना ह्या सर्व कार्यक्रमांचा त्रास होत असणार पण आता घर बदलणे अवघड होऊन बसले आहे. घर घेतेवेळी काय काय गोष्टी बघून घेणार हो? मग आपण पुर्वी मशिदीतून येणार्‍या बांगेवर चिडत असू हे आठवून लाज वाटायला लागली.

पण या नव्या ध्वनिप्रदूषणामुळे कां कशामुळे होईना त्या मशिदीतील बांग पुन्हा सुरू झाली आहे. बघूया निवडणूकीनंतर काही परिवर्तन दिसते का.